Wednesday 30 October 2013

ऋतू प्रेमरंगी

ऋतू प्रेमरंगी

मला आठवेना, तुला आठवेना
कशी  कोण जाणे, कधी भेट झाली ……

कशी सांज आली, कधी रात झाली
कळेना जराही, मलाही तुलाही ……

नभी चांदण्यांची, किती आज गर्दी
सखी ये जराशी, अशी बाहुपाशी……

अता सोसवेना, दुरावा जराही
सखी सांजवेळी, जरा घे उभारी ……

नको साथ सोडू, अश्या सांजवेळी,
नको बंध तोडू, ऋतू प्रेमरंगी……

तुझा ध्यास सखये, किती प्रीत न्यारी
कळेना तरी, का मना वेड लावी ???

मिलिंद कुंभारे

Friday 25 October 2013

अंतरीची वेदना

अंतरीची वेदना 

रोजच्या स्वप्नात माझ्या, येउनी जातेस तू
आसवांचा प्रांत मागे, सोडुनी जातेस तू ……

बांध माझ्या भावनांचा, फोडुनी जातेस तू
अंतरीच्या वेदनांना, छेडुनी जातेस तू ……

सांजवेळी तारकांना, पेटवुन जातेस तू
काळजाशी घाव ओला, ठेवुनी जातेस तू ……

सागराच्या वादळाला, झेलुनी जातेस तू
रंगलेला डाव सारा, मोडुनी जातेस तू ……

रेशमाच्या बंधनाला, तोडुनी जातेस तू
श्वास माझा गुंतलेला, रोखुनी जातेस तू ……

मिलिंद कुंभारे