Wednesday 27 November 2013

तुला आठवू पाहतो मी

                                                                     

 तुला आठवू पाहतो मी
कधी बंध तुटले, कधी स्वप्न विरले
निसटले कसे क्षण सुखाचे, कळेना ….

कधी पाश सुटली, कशी प्रीत विटली
हरवले कुठे दिस गुलाबी, कळेना ……

कितीदा तुला रोखले, साहले मी
तरीही तुझी पावले का वळेना? ……

कितीही मनाशी ठरवले जरी मी
तुला विसरण्याचे मला का जमेना?……

जरीही बदलली दिशा तू स्वत:ची
तरी का मला आठवे तू? कळेना ……

मिलिंद कुंभारे

Saturday 16 November 2013

स्वप्नामधेच का रे तू भेटशी?

   
स्वप्नामधेच का रे तू भेटशी?

आयुष्य थांबल्याचा हलकाच भास झाला
तेव्हा सुरु नव्याने माझा प्रवास झाला ….

स्वप्नामधेच का रे तू भेटशी? कळेना!
प्रत्येक रात्र, दिनही माझा उदास झाला ….


माझ्या मनास वेड्या चाहूल लागली अन
असशील भोवती तू हळुवार भास झाला ….

शोधीत श्वास, गंधित क्षण ते, तुझ्यात होते
पण व्यर्थ का असा रे सारा प्रयास झाला ….

मी जीवना तुझा रे! जेव्हा हिशोब लिहिला 
त्याचा उगाच माझ्या जगण्यास त्रास झाला ….

मिलिंद कुंभारे



Tuesday 12 November 2013

कशी गीत गाऊ

कशी गीत गाऊ


कळेना कधी गुंतले, संपले मी
तरीही कुठे बावरी, चालले मी …

जरी पारखी मी तुझ्या संगतीला
सुखांशी तरीही जणू भांडले मी …

जराशी जराशी अता राहिले मी
व्यथा, वेदनांनी जणू वेढले मी …

जुनेरे कसे गीत गावे नव्याने?
अता आटली आसवे, गोठले मी …

कसे आवरू सावरू मी स्वत:ला
कळेना कधी थांबले, भंगले मी ….

किती देत राहू मला मी दिलासे
तुझ्या आठवांनी मला जाळले मी ….

मिलिंद कुंभारे