प्रश्नचिन्ह? |
स्वप्नी माझ्या
रोज येतेस तू
घेऊन एक
प्रश्नचिन्ह?
नको नको म्हणताना
तोच हट्ट करतेस तू!
मनातल्या व्यथा
मनातच दडवत;
प्रश्नांचा गुंता करतेस तू!
शब्द तुझे गोठले असताना;
आसवांचाच पाऊस
पाडतेस तू!
ओसंडून जाऊ दे
बांध मुक्या भावनांचा
कदाचित तो प्रवाह
शोधील एक चोरवाट;
जी घेईल ध्यास
तुझ्या अंतरीच्या
अव्यक्त वेदनांचा!
तेव्हा नसतील कुठलेच प्रश्नचिन्ह!
असेल फक्त एक जिव्हाळा
जसा रानावनातला गारवा!
कदाचित
असेल ती एक निखळ मैत्री
दिव्यातल्या धगधगत्या ज्योतीसारखी!
किंवा
असेल ते एक अतूट बंधन
प्रीतीच्या धाग्यांनी घट्ट गुंफलेलं!
कधीही न तुटणार!
कधीही न सुटणार!
पण नसतील कुठलेच प्रश्नचिन्ह!
असेल फक्त एक प्रवास;
सहज, सोपा
शून्याकडून जीवनाकडे वळणारा!
कदाचित
असेल तो एक सहप्रवास;
चार पावलांचा, चार कप्यापलीकडला!
तुझ्या - माझ्या मनाचा
शिखर अन क्षितीज गाठणारा!
स्वप्नी माझ्या
आता तू येऊ नकोस!
प्रश्नांचा गुंता वाढवू नकोस!
तुझ्याशिवाय मी जगावे
कि माझ्याशिवाय तू जगावे;
मला न उमगलेलं
ते एक सत्य असावं!
अर्धसत्य!
कि
पुन्हा एक प्रश्नचिन्ह?
मिलिंद कुंभारे
No comments:
Post a Comment
अप्रतिम, सुंदर, छान