Saturday 4 May 2013

मदिरा


मदिरा


चांदराती त्या,
पडला होता सडा चांदण्यांचा,
अन मज सोबतीला,
निशा, शीतला, चंचला,
एवढ्यातच मज भेटली,
एक मदिरा,
बघितले तिज मी,
मला खुणावताना,
जवळ येउन
म्हणाली मजला,
चाखतोस का
एक थेंब मद्याचा,
बघ क्षणात अनुभवशील,
आनंद तू स्वर्गसुखाचा,
त्याच क्षणी,
नजरेआड झाल्या त्या,
निशा, शीतला, चंचला,
अन भाळलो मी
तिच्याच मादकतेला,
चाखला एक थेंब मदिरेचा,
दुजा, तिजा, चौथा अन,
प्यालो पूर्णच प्याला,
कळलेच नाही,
कशी, केव्हा,
चढली मज
धुंद नशा!

आठवेना मज आता,
प्यालो मी किती मदिरा,
एरव्ही मी मिठीत प्रेमसिंधुच्या,
अन पहाटे असे नयनी माझ्या,
सदैव पारिजात फुललेला,
आज पहिले मी,
स्वतःच स्वतःला,
गटारात लोळलेला,
आठवे मज आता,
ती चांदरात, अन त्या,
निशा, शीतला, चंचला!

त्याच क्षणी कोसू लागलो,
त्या भाळल्या क्षणाला,
त्या क्षणिक सुखाला,
त्या फसव्या मादकतेला!

पण अजूनही मज कळेना,
हुरहूर का सारखी मनाला,
पावले माझी का वळती,
पुन्हा पुन्हा, त्याच वाटेला!
अजूनही मज कळेना,
ओढ मज का असती,
वेड मज का लावती,
अन पुन्हा पुन्हा,
मज का भाळती,
अजूनही,
तीच मदिरा!
तीच मदिरा!

मिलिंद कुंभारे

2 comments:

  1. ’पीलास’ शब्द वगळून कृपया ’प्यायलास’ करावे. आणि वर एका कवितेत ’मनवा’ असा शब्द वापरला आहे. ’मन’ या शब्दाचा पारंपारिक हिन्दी भाषेतील तो अपभ्रंश आहे. उत्तर प्रदेशातील पुरातन मारवा प्रांतातून आलेल्या अपभ्रंशातील हा एक. तोही बदलता आल्यास जरूर बदलवा. माफ करा पण ते ऐकायला बरे वाटत नाही, म्हणून सुचवावेसे वाटले. योग्य कल्पनांना योग्य शब्दाची जोड असणे सार्थक ठरेल.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रिय मित्र ,
      आनंद,
      प्रतिसादाबद्दल व तुमच्या योग्य अश्या सूचनांबद्दल धन्यवाद! ’पीलास’ शब्द वगळून ’प्यायलास’ शब्द बरोबर वाटते , तसे मी बदल करतोय …. मनवा हा शब्द फक्त कवितेला एक लय असावी म्हणून वापरला आहे …’मन’ या शब्दाचा पारंपारिक हिन्दी भाषेतील तो अपभ्रंश आहे हे मला माहित नव्हते … पण हि कविता मी खूप ठिकाणी share केली आहे त्यामुळे तो शब्द बदलावासा नाही वाटत …. आपल्या प्रतिक्रियेबद्दल व मार्गदर्शनाबद्दल आभारी आहे …. खरे सांगायचे तर मी कवी नाही म्हणूनच भरपूर चुका माझ्या लिखाणात आढळल्या असतील…. पण तरीही सारखे काहीतरी लिहावेसे वाटते म्हणून लिहित असतो……

      Delete

अप्रतिम, सुंदर, छान